लेबल

शनिवार, २७ जून, २०१५

आठवणींचा पाऊस ( ललित)



आठवणींचा पाऊस  (ललित)
      -प्र.श्री.जाधव, मुखेड
थोड्या वेळापुरताच वारा होतो गप्प. जणू थकून भागून दमलेल्या वासरासारखा, अन् एकाकी येतात ढग भरून.... आभाळ झाकोळून जाते. काळंमिट्ट... पावसाचे टपोरे थेंब टपटपायला लागतात. बघता बघता पावसाची विलंब गती द्रुत हाऊन जाते. पाऊस बेभान....पाऊस धुव्वाधार...! पाऊस एकदमच छोटा होणारा... पाऊस एकदमच मोठा होणारा... पाऊस लहरी....! पाऊस मधून मधूनच कुशल वादकाने वाजवावेत तुकडे, मुखडे आणि यावे समेवर तसेच.  तसेच...! अगदी तसेच..!! काही वेळ पावसाचा खेळ चालू राहतो. ‘सम से समतक’ किंवा ‘काल से सम तक’ असा.  वादकाने वाजवता वाजवताच मध्येच पकडावा रेला अन्  श्रोत्यांचा रोखला जावा श्वास समेवर येईपर्यंत तस्संच..! सारी सृष्टीच जणू श्वास रोखून धरते अन् धडाडत राहतो पावसाचा धुव्वाधार ताल...! आणि कहर म्हणून की काय, वाजवत वाजवतच पावसाचा बेभान व्हावा ‘चक्रदार’ आणि ‘सलाम-प्रणाम-कत्-धाऽऽ’ ची व्हावी जोरदार तिहाई... तस्सीच भल्याभल्यांची उडून जाते भंबेरी, रोखून धरलेला श्वास  व्हावा मोकळा अन् सोडावा सुस्कारा सुटकेचा... तसंच...! एका अनामिक पकडीतून सुटल्याचा व्हावा भास अन् रसिकांनी भारावून जाऊन द्यावी दाद. मनमुराद...! नकळत हातही टाळीसाठी सरसावतात. तस्संच...! अगदी तस्संच...!! निसर्गातल्या या विराट अन् अचाट सामर्थ्यापुढं नतमस्तक व्हावं नास्तिकानंही....! एकाएकी. तसंच हे....! आणि नकळत बाहेर पडतात उद्गार ‘व्वा क्या बात है !’ चे  प्रत्येकाच्या तोंडून...!
पावसासारखं मनालाही कुठेतरी बरसता आलं असतं तर किती चांगलं झालं असतं नाही ! पण तशी सोय निसर्गानं मानवाला दिली नाही. म्हणून हे असं मनाचं बरसणं. मनातच. मनाच्या विषण्णं आठवणीत आपण होऊन जातो खट्टू. भावनांच्या हिंदोळ्यावर स्वार झालेलं मन मात्र बरसत राहते पावसासारखं. पावसाचा ठेका धरून बरसून घेतं मनामनात... मनसोक्तं...! खरंतर मनानं असं मनस्वीपण जपायलाच नको. पण मन असं की अत्यंत हळवं. इंद्रधनुष्याचच्यया रंगासारखं...! मनाचे अनेक कंगोंरेही एका भावनेतून अनेक भावनेत गुंतून गलेले. सांगता येत नाहीत कोणत्या रंगाची सुरुवात नेमकी कोठून झाली. अन् नेमके कोठे संपली... मन नुसतंच भावविभोर झालेलं. आवणींच्या हिदोळ्यावर स्वार झालेलं.    
पाऊस पडलाय... ओसरलाय.... सारी सृष्टी आता खळाळत वाहते आहे. ओलाचिंब गारवा वातावरणात भरून गेलाय. वर आभाळात ढगांची ही गर्दी....! त्यांचं क्षणाक्षणाला बदलत जाणारं धुसर रूप....झाडे वेली पानांपानांतून न्हाऊन निघालीत... एक नवयौवना सुकवते केस तसं हे सृष्टीचं निथळणं...! अशा वातावरणात काही गाण्यांची मुददाम आठवण होते-
‘नभ उतरू आलंऽऽ ऽऽऽ, सारं झिम्मड झालंऽ ’
लता दिदींच्या सुरांची जादू काय सांगावी? ही जाणीवच जणू या गाण्यातून जिवंत करून जाते. निसर्गाचं अस्सं रूप साक्षात होते...! पाऊस असाच लागून राहिलेला. झडपाऊस... भीजपाऊस..झिम्मड पाऊस...! वाटतं, सारं आसमंतच खाली उतरलंय. तृप्तीचं ढेकर कसं मस्त असतं नाही? तसंच हे ! नकळत मनही गायला लागुणगुणाबरवेतमाभविषष्ययाच्यया प्रांगणातही....! आणि आठवणींचा तालही धरतो.
अस्साच पावसासारखा..! तालबद्ध.. लयबद्ध... जणू आठवणींचे तुकडे, मुखडे, रेले...उठावणे...काल से काल तक..... समसे सम तक... ठेका तिहाई.. सलाम-प्रणाम कत्धा चा. ठेका मनाचा. हेका मनाचा... ठेका काल-दिक्काला पर्यंत..‘ ठेका’ समेपर्यंत.....! कळत नाही.. गोड, कडू अनुभवांच्या तूकड्या-तुकड्यांत किती अन् कसे हरवून जातो आपण. कळत-नकळत तुकड्या, मुखड््यांच्या अशा लयींबरोबर हरवून जातो आपण... जणू आपलं अस्तित्वही..! आठवणींचा पाऊसही... तस्साच...!
      
आकाशत ढगांची गर्दी झाली की, या कातरवेळी माणसाचं मन फारच हळवं होऊन जाते. उगीच ‘त्या’ ला म्हणे ‘ती’ ची आठवण सतावीत राहते. मनाची ही अगतिकता नि अनामिक ओढ गुणगुणायला लागते-
‘पंछी बनू उडते चलूॅ मस्त गगन मे।
आज नया खेल खेलूॅ मस्त गगन मे।।
       किंवा
पंख होते तो उडं आते रे। 
कैसे आऊॅं बल मॉ?’
कधी कधी तर तिच्या किंवा त्याच्या अनेक आठवणी त्याला किंवा तिला सतावत राहतात. हातून घडून गेलेल्या अनेक चुकांची आठवण होत राहत.े तो क्षण पुन्हा पकडता आला तर? पण छे! तषी काही सोयच नाही. आभाळांतल्या मेघांप्रमाणंच मनही बरसत राहते सरीवर सरी रिचवून...! बाहेर पाऊसही झिम्मड होऊन बरसायला लागतो. नकळत डोळयांतूनही ओघळायला लागतात धारा.... आठवणीच्या....!! आठवणींचा पाऊसही असाच. झिम्मड...! बेभान होऊन बरसायला लागतो. कधीकधी नेत्रांतूनही झरायला लागतो, झिरपायला लागतो. आठवणींचा निचरा होईपर्यत...! मनाचा अन् पावसाचा पकडला जातो ठेका. बाहेर कोसळणा-या वळचणींच्या पडणा-या पांगोळ्यांसोबत... अन् होऊन जाते आसवांची... आठवांची दमदार तिहाई...! अन् खाड्कन येतो भानावर; तर पाऊस उघडलेला....! पाणी आता निथळत आहे, पानापांनावरून....! अनेक सतावणा-या अतितीव्र भावनांचा निचरा झाल्याची जाणीव...! आता मस्त मोकळेपणा जाणवतोय... मन हलके हलके झाल्यासारखे वाटतेय... आतापर्यंतच्या या कालावधीची कालक्रमणा पाहिली, तर ती लागलेली तंद्री का समाधी? ती लय, विलय की, अंतर्लय ? तादात्म्यता? की, तदरूपता? छे! काही उमगत नाही....! काही कळत नाही...! घडून जाते पावसाचे बरसणे नि रडून घेते मनही; त्या पावसाबरोबर....!
       मधून मधून पडावं लख्खं लख्खं उन्हं... अन् टपटपत राहावेत थेंब पर्णापर्णांतून.... तस्स्याच.....! चुकार आठवणीही तरळून जातात त्या टुकार नि चुकार थेंबाथेंबांतून.
       ‘गुज ओठांनी ओठांना सांगायचं
       एका पावसात दोघांनी भिजायचं’
       एखादी जाणीव कधी होत राहते. कधीकधी मन ओढ घेत राहते, पण जर ती जाणीवच ‘उणीव’ असली तर...?.तर काही सांगायलाच नको.!
       ‘अजुनी मला आठवते, ती रात पावसाळी
       मने धुंद वेडी, हवा पावसाळी.......’
       मनाला होणा-या या जाणिवा एवढ्या समृद्ध असतात की, बाकीच्या उणिवा आठवतही नाहीत. आठवांचा हा जागर प्रत्यक्षाची अनुभुती देतो. या पावसाचं हेही एक बरं. थोड्यावेळापुरतंच का होईना, उणिवा विसरून जातो आपण...!
....अन् हळूच येतो भानावर, तर हे लख्खं उन्हं पडलेलं..! ह्याबरोबरच चोंदलेल्या मनालाही येते जाण. एक उभारी....अन् वास्तवातल्या सान्निध्यांतले आपले जागृतपण.... निसर्गाच्या या नयनरम्य नाट्यांतून प्रवेश घडवत जातात, तद्वतच या स्वप्नावस्थेतूनही येतो आपण बाहेर अन् चालू लागतात पाय.... मुक्कामाकडे... रिकाम्या रिकाम्या झालेल्या वाटेने. पाणी वाहून जाऊन स्वच्छ झालेल्या वाटेने....! अगदी रिकाम्या मनाने.... हलक्या तरल संवेदनेत...! निसर्गात झालेल्या नव बदलासंह आपणही तरळत राहतो... नवचैतन्यांत हुंदडत राहतो. पंख झडकून मारावी भरारी पाखराने तसेच...! मनाच्या या तरल अवस्थेत तरळत राहतो.... आठवणी आणि पाऊस दरवेळी...! पुन्हा...पुन्हा..!!