लेबल

रविवार, २६ जुलै, २०१५

युगानुयुगाची ही लागलेली वारी


 युगानुयुगाची ही  लागलेली वारी

उभा तो विठ्ठल, उभे वारकरी
युगानुयुगाची ही  लागलेली वारी //ध्रु //

वाहते झुळूझुळू  अजून चंद्रभागा
 नामस कीर्तनाची वाहे ज्ञानगंगा
अंग अंग नाहू गोपीचंद लावू
गाऊन  अभंग पावन होऊ सारी //१//

गळ्यात माळ कपाळी  बुका
भक्तांना मेळवी पांडुरंग सखा
आवडीने गाती ओढीने येती
घेऊनी पताका ही  खांद्यावरी //२//

ज्ञानोबा तुकाराम जयघोष करू
भक्तीची पताका रिंगण उभारू
अर्पुनी मन हरपुनी भान
नाचे लहानथोर नाचे वारकरी //३//















गुरुवार, ९ जुलै, २०१५

नाते मात्र जुळलेच नाही

नाते मात्र जुळलेच नाही

मी नेमका कुठे आहे 
अजून हे कळलेच नाही 
वाट तरी चालतात पाय 
गाव ते सापडलेच नाही !

ओंजळीतल्या पाण्यासारखं 
आयुष्य रोज सांडत गेलं 
हाती  गवसल्या क्षणानाही 
धरून ठेवणे जमलेच नाही !

माणसे कित्येक भेटत गेली 
साथ अशी मिळाली नाही 
भाव असून अंतःकरणात 
नाते मात्र जुळलेच नाही!!

रविवार, ५ जुलै, २०१५

नव अंकुर फुटतो

नव अंकुर फुटतो 

नाद भरल्या रानात 
ताल भेमान वाजतो 
मेघ  पाहून आभाळी 
धुंद मयूर नाचतो 

असा झिम्मड पाऊस
वारा  फुगडी खेळतो 
गंध  मातीचा सुटला 
मन पिसारा फुलतो 

जाता स्पर्शून तुषार 
अंगी शहारा उठतो 
चिंब भिजल्या मातीत 
नव अंकुर फुटतो