धीनक् ताता
धीनक् धीनक् धीनक् ताता, धीनक् धीनक् धीनक् ताता, कडडड कडडड कडडड... ढोलताषांचा आवाज घुमत राहतो. मधून मधून गुलालाचा फवारा हवेत पसरतो... केसांपासून ते पायांपर्यंत माखलेला देह झिंग चढलेल्या तो-यात खांद्यावर उचलला जातो. अन् एकदम विजयोन्माद उफाळून येतो. ‘आजा रे आला.......’
‘..............चा विजय असो !’ असा जयघोष......गुलाल अन् ताषांच्या टिप-यांत मिसळून जातो....जागोजाग फटाक्यांची आतशबाजी अन् घोषणांचा निनाद दणाणून जातो. मागे उरते फक्त पावलांच्या ठशांत विखुरलेली गुलालाची धूळ.
महिना दीड महिन्यापासून निवडणूक प्रक्रियेत गुंतलेल्या मातब्बर मंडळीचं चीज होतं. जागोजागी गळ्यात पडणारे विजयश्रीचे हार मनाला हरखून टाकतात. हातात हात घेऊन होणारे हस्तांदोलने अन् शुभेच्छा मनातला विश्वास दृढ करतात. कसे एक प्रकारचं सार्थकत्व, कृतज्ञत्व साठलेलं असतं.! सारंच कसं भारावून टाकणारे वातावरण अन् भरून गेलेली मने, विजयोन्मादाचा शिखरावर आरूढ झालेली असतात. ताषांचा टीपेला पोहोचलेल्या आवाजांवर....!
खरेतर हा सोहळा म्हणजे पाहणा-यांना अन् अनुभवणा-यांना एक सुखद धक्का देऊन जातो. काल परवा पर्यंत वर-वर ‘बरं बरं' म्हणणारी माणसेही
कशी तत्परतेनं सामोरी येतात. हस्तांदोलने झडतात. त्याचा खराखुरा स्पर्श दोघांनाही किती खरा न् किती खोटा ते सांगून जातो. पण हा धीनक् ताता धीनक् ताता वाजतच राहतो. सा-यांनाच...मतवाल्यांनाही ‘मत’वाल्यानांही...एकाच ठेक्यात झुलत ठेवतो. विजयोन्मादाच्या झिंगेत सारेच झुलत राहतात.
खरेतर कितीतरी दिवसांपासून ‘तहान-भूक विसरून’ म्हणण्यापेक्षा तहान-भूक तृप्त करून...! घरदार सोडून बाहेर पडलेले कार्यकर्ते थकून गेलेले असतात. पण ‘कायापालटाच्या’ ह्या नाट्यात त्यांची त्यांनाच पर्वा नसते. दिवसभर इकडून तिकडे -अन् तिकडून इकडे फिरत, कोण मागे, कोण पुढे ह्याचा अदमास घेत पार थकून गेलेले असतात. परंतु पोटात गिळलेल्या कित्येक ‘गोळ्यांना’ पायांत उठणा-या गोळ्यांची असतेच कुठली पर्वा?...दर खेपेगणिक जल्लोष चालतो. ‘गोळ्यांचा इमान राखत..!’ मधून मधून चालत राहते ‘कोल्हे कुई’ अन् ढोल ताषांचा ‘धीनक् ताता, धीनक् ताता’ वाजतच राहतो.
दुरून दुरून कानोसा घेणारे कळपही पराभूत कुत्र्यांसारखे दात विचकावत हळूहळू ह्या धीनक् ताता त सामील होण्याचा प्रयत्न करतात. ह्यामुळे ताषांच्या टिप-यांना भलताच चेव चढतो. लकलक हलणारे अन् गुलालाने माखलेले केस अधिकच धुरळून टाकतात...भुरळून टाकतात...जल्लोषाच्या उद्गारात भपकन् विशिष्ट वासांचे भपकारे दरवळतात...तसेच काही जण पायखूर झाडणा-या कुत्र्यांप्रमाणे आवेश धारण केलेले असतात. अषाच गर्दीतून एखादा बापडा तोंड लपवून, शेवटी पायात पाय घालून पळणा-या कुत्र्यांसारखे पळ काढू लागतात. मग तर ‘धीनक् ताता’ अधिकच तडतडू लागतो.
निवडणुकीच्या धामधुमीतले हे दिवस सा-यांनाच घामाघुम करवान टाकतात. मतदार, उमेदवार, कार्यकर्ते, पक्षनेते, सारेच सारेच झपाटून गेलेले असतात. सभा बैठका आडाखे तडाखे चालूच असतात. रस्त्यारस्त्यांवर, चौकाचौकांवर... अख्खा मतदारसंघ रंगात रंगलेला असतो..! कुणी सोयरा घेऊन येतो, कुणी ‘जाहीरनामा’ घेऊन येतो, तर कुणी ‘डंकाच’ घेऊन येतो. शासकीय पंचवार्षिक योजनांपेक्षा ह्या निवडणूक कार्यकालात ‘विधायक’ कामाला ऊत येतो. कुठे बोअर मारले जातात, तर कुठे मंदिरे उभारली जातात. कुठे पुतळे उभारले जातात, तर कुठे रस्ते दुरूस्त केले जातात. एकाएकी हे असं लोकप्रेम उफाळून येतं. अन् लोकशाही झुलू लागते, झुलणा-या हत्तीसारखी. अन् अशाच मदमत्त हत्तीवरून मातब्बरांची सुरू होते खैरात. लोकशाहीच्या नावावर..! ‘शाही’ इतमामात...! ह्या वरातीपुढे लोकशाहीचे ‘पाईक’ म्हणवणारे भक्तही रांगा लावून उभे असतात. कधी मंदिराच्या बांधकामाचा प्रस्ताव घेऊन, कधी रस्ता दुरुस्तीचा प्रस्ताव घेऊन.... अन् मागत असतात खैरात... ‘दे दे बाबा ! लोकशाही के नाम पे, दे दे...!’ म्हणत. खैरात मिळताच सुरू होतो जयघोष अन् ढोलताषा वाजत राहतो... तडतड तडतड तड्ड्ड्ड्, ‘धीनक् ताता धीनक् ताता, धीनक् धीनक् धीनक् ताता...धीनक् ताता धीनक् ताता, धीनक् धीनक्, धीनक् ताता...’ पुन्हा..! पुन्हा...!!